Thursday, 8 December 2016

जागे व्हा

जागे व्हा
      दिवाळी संपली की लगेचच सहलीला जाण्याची तयारी सुरु होते. पर्यटनासाठी हा अतिशय सुंदर काळ असतो. थंडीला सुरुवात झालेली असते. त्यामुळे हे वातावरण समुद्र किनारी पर्यटनासाठी तर अत्यंत आल्हाददायी असते. पण समुद्र किनारी गोवा, गुहागर, मालवण, तारकर्ली, हरणे बंदर अशा ठिकाणी जर हव्या तशा सोयी असणारे बीच रेसॉर्ट वगैरे हवे असेल तर याचे मात्र 2-3 महिन्यापूर्वी नियोजन करावे लागते. अशाच प्रकारे आम्ही यावर्षी मालवण-तारकर्ली बीच वर सहल केली. आजुबाजुच्या परिसरातील छोट्या छोट्या पर्यटन स्थळांनाही भेटी दिल्या.
      तारकर्ली बीच, देवबाग, सिंधूदूर्ग, विजयदूर्ग, रॉक गार्डन, कालनिर्णयकार, साळगांवकरांचे गणेश मंदिर, डॉल्फीन सफर, त्सुनामी बेट, अशा अनेक स्थळांना भेटी दिल्या. भारताच्या समुद्रकिनाऱ्यावर ज्यावेळी त्सुनामी प्रहार झाला त्यावेळी भूगर्भातील हालचालींमुळे तारकर्ली बीचच्या पुढे एक नविन छोटेसे बेट तयार झाले आहे. या बेटावर जाण्यासाठी छोट्या होड्या उपलब्ध आहेत. याठिकाणी पर्यटन विकास खुप फोफावत आहे. अनेक प्रकारच्या water games याठिकाणी उपलब्ध आहेत. रॉक गार्डन म्हणजे तर चमत्कारच आहे. कित्येक वर्षे अनेक दगड याठिकाणी समुद्राच्या लाटांशी खेळत आहेत. बऱ्याच ठिकाणची समुद्र रचना पाहिल्यामुळे मला याठिकाणी वेगळे असे जाणवले की या भागात समुद्रात व समुद्राच्या किनारी मोठमोठ्या दगडांची संख्या पुष्कळ आहे. याचाच उपयोग शिवाजी महाराजांनी दूरदृष्टीने करुन घेतला असणार व विजयदूर्ग आणि सिंधूदूर्ग किल्ले बांधले असणार हे नक्कीच. पर्यटनासाठी हा भाग फारच छान आहे.
      मालवणच्या किनाऱ्यावरील पाण्यात जेंव्हा आम्ही मनमुराद खेळत होतो, त्याचवेळी बऱ्याचवेळा प्लॅस्टीक पिशव्या, बाटल्या लाटांबरोबर किनाऱ्यावर येत होत्या आणि परत आंत खेचल्या जात होत्या. खरं तर रत्नागिरी, गुहागर, गणपतिपुळे या सर्वांपेक्षा याठिकाणी आम्हाला अनेक समुद्री जीव दिसले. छोटे मासे, स्टार फीश पण या सगळ्या गोष्टींचा या समुद्रजीवांना नक्कीच त्रास होत असणार असे वाटते. त्सुनामी बेटावर जाताना तर आपण केर्ली नदीच्या पात्रातून समुद्राच्या पात्रात प्रवेश करतो, तो अनुभव फार वेगळा असतो पण याठिकाणी सुद्धा पाण्यावर प्लॅस्टीक बाटल्या तरंगत होत्या. सिंधूदूर्ग किल्ल्यावर तर ज्या ज्या ठिकाणी जागा मिळेल त्याठिकाणी पर्यटकांनी कोल्ड्रींक्स, पाण्याच्या बॉटल्स फेकलेल्या दिसल्या. बुरुजावरुन छोट्या छोट्या खिडक्या आहेत. ज्यातून समुद्रातील दूरवरच्या हालचालींचे निरिक्षण करता येते. त्या छोट्या छोट्या खिडक्यामध्ये प्लॅस्टीक बाटल्या कोंबून कोंबून भरलेल्या दिसल्या. या गोष्टींचा मनाला खूप त्रास झाला.



      माणसाला प्रवासात त्रास होऊ नये, सर्व सोई मिळाव्यात यासाठी या सर्व गोष्टी आपणच तयार केल्या. अगदी उठल्यापासून ते झोपेपर्यंत लागणाऱ्या सर्व गोष्टी अगदी जैविकदृष्ट्या सुरक्षित पॅकेजमध्ये आपल्याला कानाकोपऱ्यात मिळत आहेत. केवढा मोठा फायदा आपल्याला या गोष्टीचा होत आहे. पण आपण त्याचे रुपांतर कशात करतो आहोत ही चिंतेची गोष्ट आहे.
      या सर्व गोष्टी पाहताना लहानपणीच्या काही घटना आठवतात. त्या वाचल्यावर कदाचित तुम्ही सुद्धा भूतकाळात जाल. साधारणपणे 82-83 च्या दरम्यान आईवडिलांबरोबर किराणामालाच्या दुकानात किराणामाल खरेदी करायला मी जायचे. किराणामालाची यादी दिल्यावर दुकानदार त्याप्रमाणे माल द्यायला लागला की त्याच्या फळीखालून आत डोकावण्यात भयंकर मजा यायची. चहा 1/2 किलो तर दुकानदार एक मोठा पत्र्याचा कंपनीचे नांव असणारा घट्ट झाकणाचा डबा माझ्या आई वडिलांना दाखवे आणि सांगे साहेब 'हे बघा आत्ताच सील फोडलंय, वास बघा कसा घमघमाट येतोय. एकदम प्युअर कंपनीचा चहा' आणि मग तो त्याचे पॅकिंग एका खाकी पिशवीत करुन देत असे. अशा सर्वच गोष्टी मोठमोठाल्या पॅकिंगमधून येत. अगदी तेल सुद्धा आपापल्या किटल्यांमधून सर्वजण वाण्याकडून मोजून आणत. पॅकिंग मधल्या वस्तूंमधे एखादीच वस्तू मिळे. उदा. पेस्ट आणि काडेपेटी या दोनच्या खोक्यांसाठी आम्ही भावंडे भांडत असू. प्लॅस्टीक पिशवीत पॅकिंग केलेल्या तर वस्तूच नसत. सर्व खाकी पिशव्या नाहीतर वर्तमानपत्राचे कागद आणि त्याला दोरा बांधलेला.
      या गोष्टींचा विचार याठिकाणी करण्याचे कारण हेच की खरंच हीच पद्धत बरोबर होती का ? कारण आत्ता बघा एकवेळचा चार माणसांचा एक महिन्याचा किराणामाल आणला की कमीतकमी 25 प्लॅस्टीक पिशव्या जमा होतात. पाच-सहा खोकी जमा होतात.पूर्वीच्या काळी दानधर्म म्हणून लोक ठिकठिकाणी वाटसरुंच्या पाण्याची सोय करायचे. पाणपोई बांधायचे. मग त्या स्वच्छ ठेवणे, त्यात पाणी भरणे हे पुण्य म्हणून केले जायचे. त्यामुळे वाटसरुंना पाणी पिताना खात्री वाटायची. आता असे होत नाही.
      पूर्वी दवाखान्यात आपण आपापली औषधाची बाटली घेऊन जायचो आणि वैद्य त्यात औषध भरुन द्यायचे आता .....
      मग सर्वच गोष्टींचा सखोल विचार केला तर असं लक्षात येतय की, मनुष्य स्वार्थी झालाय. अविश्वास, चुरस, आळशीपणा, सुखासीनता, Instant या सर्व दुर्गुणांमुळे अशा shortcuts ची गरज निर्माण होत आहे.मग अस जर प्रत्येक घरटी होतयं तर आपण किती भौतिक कचरा गोळा करतोय याची विल्हेवाट आपण कशी लावणार? दुधाचे उदाहरण सुद्धा तुम्हाला आठवेल, पूर्वी गवळी मोठ्या किटलीतून दूध आणायचा आणि मापाने आपल्या पातेल्यात ओतायचा. पण आता प्रत्येक घराघरात प्लॅस्टीक पिशवीतूनच दूध पोहोच होते. भले अगदी तुम्ही पुर्नचक्रिकरण होणारे प्लॅस्टीक वापरलेत तरी त्याच्यावर होणारा खर्च हा त्या उत्पादनावरच लावला जाणार आणि या वागण्यातून असाच भौतिक कचरा निर्माण होत जाणार. मग त्याची विल्हेवाट आपण वर उल्लेख केल्याप्रमाणे लावणार. अगदी ऐतिहासिक, धार्मिक स्थळे सुद्धा आपण सोडणार नाही.
      विश्वासाचा भाग ज्याठिकाणी कमी होतो तिथे आपण पर्याय निव़डायला सुरुवात करतो. मग व्यापारी व ग्राहक यांच्यातील विश्वासाला तडा गेल्याने हे सर्व चक्र सुरु झाले. जर सर्वांनीच एकमेकांवरील विश्वास दृढ केला तर काही गोष्टीतरी आपण टाळू शकतो. किंवा मग मनात असा विचार येतो की खरंच पापपुण्याच्या भितीने जर माणूस नियमाने आणि इतरांना त्रास न होता वागत असेल तर हीच कल्पना योग्य होती का ? आपण कांही गोष्टींना, प्रथांना खरंच मोडीत काढून चूक करतोय का ?
      कारण माणसाची सध्या वृत्तीच अशी आहे की,
      फलं पुण्यस्य इच्छन्ति पुण्यं नेच्छन्ति मानवाः ।
      फलं पापस्य नेच्छन्ति पापं कुर्वंन्ति नित्यशः ।।
      पुण्याचे फळ हवे आहे पण पुण्य करायचे नाही आणि पापाचे फळ नको आहे पण पाप नेहमीच करायचे. म्हणजे थोडक्यात आम्ही कचरा निर्माण करणार आणि तो स्वच्छ करण्याची जबाबदारी शासनाची, सामाजिक संस्थांची किंवा मी सोडून इतर कुणाचीही. साधा विचार आहे पर्यावरण रक्षणासाठी प्लॅस्टीक मूक्त गांव, शहर अशा कितीतरी संकल्पना अनेक सामाजिक संस्थांकडून राबविल्या जात आहेत. पण हा मुळात प्रश्न निर्माण का झाला आहे याकडे देखील गांभीर्याने आपण पाहुया असे मला वाटते. प्रत्येकवेळी प्लॅस्टीक पिशवीचा अट्टाहास नको. शिवाय ज्या ज्या ठिकाणी आपल्याला स्वतः पाणी इ. नेणे शक्य आहे, पदार्थ डब्यातून नेणे शक्य आहे तिथे तिथे ते नेऊया. डिस्पोजेबल वस्तूंच्या ऐवजी घरातील पुनर्वापर करता येणाऱ्या वस्तूंचा वापर करुया. यामध्ये घासण्याचे, पुसण्याचे कष्ट वाढतील पण पर्यावरण रक्षणाचे मोठे कार्य आपल्या हातून घडेल, आणि ते स्वतःपासूनच केले पाहिजे हे नक्की.    


माधुरी अभय कुलकर्णी
कन्याशाळा कराड.