Friday, 2 September 2016

जावे त्याच्या वंशा....


      राज्य सरकारनं नवीन शैक्षणिक धोरण मसुद्याच्या रुपात मांडल, ज्यावर अनेकांकडून सूचनांची मागणी केली पण ते धोरण अंमलात आणणार किंवा नाही यावर निर्णय होण्याआधीच शाळा 6 तास असावी, की 8 तास - अल्पसंख्यांक सवलती यावरुनच महाचर्चा सुरु झाली.
      प्रसारमाध्यमांनी यावर लगेचच लाईव्ह चर्चा घडवून आणली. त्यामध्ये अनेक शिक्षणतज्ञ, आमदार यांनी आपली मते व्यक्त केली. रविवार दि.22 नोव्हेंबर 2015 च्या सकाळ सप्तरंग मध्ये मा.हेरंब कुलकर्णी आणि सिद्धेश्वर डुकरे यांचे चिंतन वाचावयास मिळाले.
      एक शिक्षिका, म्हणजे हे सर्व प्रत्यक्षांत आणणारी on field काम करणारी व्यक्ती म्हणून सर्व शिक्षकांच्या वतीने अनुभव येथे मांडते आहे. गेले कित्येक दिवस ठिकठिकाणी ही चर्चा ऐकायला मिळते आहे की शिक्षकांना "इतक्या सुट्ट्या नकोत" आणि "दिवाळीची आणि उन्हाळ्याची सुट्टी इतकी कशासाठी ?"
      शिक्षकांच्या सुट्ट्यांचा आणि तासांचा हिशोब मला वाटतंय प्रत्यक्ष काम करणाऱ्या व्यक्तिच्या सानिध्यात 1 शैक्षणिक वर्ष राहून करावा. अधिकृत शाळा जरी दरवर्षी 15 जून पासून सुरु होत असल्या तरी 1 जून पासून 10 वी व काही वर्गांचे अप्रगतचे तास वेळापत्रकाप्रमाणे घड्याळी 4 तास सुरु झालेले असतात. यावर्षीच्या सुट्ट्यांचा जर आपण हिशोब केला तर एकूण रविवार (1मे ते 15 जून) सोडून 38 + इतर 15 सुट्ट्या = एकूण 53 दिवस सुट्टी घेतली. त्यातही या सर्व सुट्ट्या फक्त शिक्षकांनीच घेतलेल्या नाहीत. सर्वच शासकीय विभागांनी घेतलेल्या आहेत. मे महिन्याची उन्हाळी सुट्टी 4 मे पासून ते साधारण 15 जून पर्यंत मांडली जाते. पण प्रत्यक्षात 1 मे पासून 31 मे पर्यंतच शिक्षक सुट्टी घेतात.(कोणतेही प्रशिक्षण नसेल तर) त्यानंतर उन्हाळी वर्ग चालू होतात. दिवाळीची सुट्टी सुमारे 17 दिवस दिसते आहे. परंतू प्रत्येक शिक्षकाला कमीतकमी 80 गुणांचे 4, 40 गुणांचे 2, 5 वी ते 8 वी चे 3 असे गठ्ठे तपासायला असतात. कदाचित मी चांगल्या सुबत्ता असणाऱ्या शाळेत काम करतेय म्हणून ही संख्या कमी असेल. याहूनही बिकट अवस्था बऱ्याच शाळांमधून आहे. यामध्ये प्रत्येक वर्गाचा पट 60 ते 70 च्या दरम्यान असतोच. 7 वर्ग x सरासरी 65 पेपर = 455 पेपर्स प्रत्येक शिक्षकाला किमान डोळ्याखालून घालावे लागतात. प्रत्येक पेपरला किमान 10 मि.लागतात. 4550 मिनिटे पेपर तपासणे हे काम सुरु असते. 75 तास पेपर तपासण्यासाठी आवश्यक आहेत. ( दिवसानुसार हिशोब केला तर किमान 2 दिवस 1 गठ्ठ्यासाठी -14 दिवस पेपर तपासणे + याद्या + आकरिक,संकलित कागद बनविणे इ.) मग शिक्षकांना असणारी दिवाळीची सुट्टी त्याने उपभोगली का ?
      शाळा शाळामध्ये गणेशोत्सव, शारदोत्सव, स्नेहसंमेलने यासारख्या उत्सवात, त्याचप्रमाणे इतर सर्व दिनांच्या वेळी कार्यक्रमांची रेलचेल असते. शिवाय कोणत्याही दिनाला-समाजकार्य करण्यासाठी-समाजाचे उद्बोधन करण्यासाठी -विद्यार्थ्यांच्या पथकाबरोबर शिक्षक कार्यरत असतात. निर्माल्य विसर्जन, वृक्ष लागवड, जल वाचवा, मूर्तिदान, ध्वनीप्रदुषण, नद्या स्वच्छता आंदोलन, कोणताही रोग निर्मुलन, जयंत्या-पुण्यतिथ्या सर्व कार्यक्रमांची जबाबदारी शालेय शिक्षकाचीच असते. मग त्यासाठी लागणारे बोर्ड, साहित्य, घोषणा फलक तयार करण्यापासून ते वाहतुक व्यवस्था सांभाळण्यापर्यंत आणि लांबून येणाऱ्या मुलांच्या बाबतीत उशीर झाला तर मुले घरी सोडण्या पर्यंतची जबाबदारी शिक्षकाचीच असते. यासर्व कामांचे तास कोणी मोजलेत का ?
      कोणत्याही बदललेल्या अभ्यासक्रमावर प्रशिक्षण होते. एक ढाचा दिला जातो. त्याप्रमाणे शिक्षकांनी आपल्या वर्गाची तयारी करावी असे अपेक्षित असते. पण ती तयारी फक्त 11 ते 6 यावेळेत होते का ? घरातला कमीत कमी दोन तास वेळ स्वयं अध्ययनासाठी दिला तरच शिक्षक आपला विषय योग्य प्रकारे शिकवू शकतो. मग या वेळेचा हिशोब आपण कधी करतो का ? प्रत्येक इयत्तावार व तुकडीवार आकारिक मूल्यमापनाप्रमाणे वेगवेगळे काठिन्य पातळी असणारे पेपर्स काढत असताना लागणारा वेळ हा शाळेव्यतिरिक्तच असतो. 
      IT कंपन्यामध्ये किंवा मोठमोठ्या संस्थांमार्फत तुम्हाला एक टार्गेट किंवा एक प्रोजेक्ट दिलेला असतो तो तुम्ही वैयक्तिक अथवा group ने पूर्ण करण्याचे Target असते आणि त्यावर तुम्हांला त्यासाठी boss कडून कांही offers मिळतात,Task taking साठी.आमच्या शिक्षकी पेशात असे Task आम्ही शिक्षकच ठेवतो व पूर्ण करतो. पण अशा काही शासकीय शाबासक्यांच्या योजना सरकारकडे आहेत का ?
      मार्च, एप्रिल महिन्यात दहावी बोर्ड च्या कामावर परिक्षक आणि नियामक, मुख्य नियामक या पदांवर तर ज्यांची नेमणूक असते त्यांचा तर कोणी फार विचारच करत नाही. खरं तर परिक्षक व इतर बोर्डच्या कामाच्या वेळी शालेय कामकाजातून मुक्तता द्यायची असते. शाळा, संस्था देतातही (कांही ठिकाणी देतही नाहीत) पण राहिलेला अभ्यासक्रम, तोंडी परीक्षा इ. काम त्या शिक्षकालाच परत पूर्ण करायचे असते. (शिक्षक हा आपल्या विद्यार्थ्यामध्ये इतका गुंतलेला असतो की,त्याचे वार्षिक नुकसान होवू नये म्हणून जादा वेळ काढून बुडलेला अभ्यासक्रम व मूल्यमापन स्वतःच पूर्ण करणे योग्य समजतो) शिवाय 10 दिवसात नियामक सभा 2 वेळा सोडून, आठ दिवसात 80 गुणांचे 300 पेपर्स तपासायचे असतात. कोणत्याही शिक्षणतज्ञांनी हे पेपर्स 11 ते 6 या शाळेच्या वेळात करुन दाखवावेत. ज्यांच्या घरी बोर्डाच्या नेमणूकीवर शिक्षक किंवा शिक्षिका असते ते घर त्या    दहा-बारा दिवसात अक्षरशः वाऱ्यावर असते. त्याचप्रमाणे पेपर्स बोर्डात जमा करताना पोती बांधणे, नेणे ही कामे स्वतः शिक्षकच करतात कारण 'शिपाई' कमी आहेत. याठिकाणी स्त्रियांची अवस्था तर फार वाईट होते. त्यावेळी घरात काय काय अडचणी-जुळवा-जुळव करावी लागते ते प्रत्यक्ष काम करणाऱ्यालाच कळेल. परंतू वरील सर्व कामे ही आपली जबाबदारी आहे व आपल्या विद्यार्थ्यांवरील प्रेमामुळे शिक्षक आजपर्यंत करत आला आहे. यासाठी प्रत्येकाने एकदा तरी हे पेपर्स तपासावेत (जावे त्याच्या वंशा असे म्हणतातच ना).
      आकरिक-संकलित मूल्यामापनाचे कागद,संचयिका नोंद पुस्तिका, भरताना त्या शाळेच्या वेळात मुलांना सांभाळत होतच नाहीत. हे सर्व काम शिक्षक रोज घरीच जाऊन करतात. यूडायसची माहिती भरताना तर शिक्षक, मुख्याध्यापक आणि क्लार्क यांच्या वेळेला सीमाच नाही. रात्री दहा दहा वाजेपर्यंत शिक्षक connectivity साठी ताठकळत थांबतात.शिवाय ही माहिती या या वेळेपर्यंत कार्यालयांना उपलब्ध झाली नाही तर तो शिक्षक व मुख्याध्यापक या गोष्टीला कायदेशीर जबाबदार राहील अशी एक धमकी वजा विनंती तळटिपेला असते. अशा वेळी त्याचे तास कोणी मोजलेत का ? यावर्षी मी स्वतःच निवडणूक कामी 3 वेळा काम केलय. तीनही शनिवार-रविवारच होते. जनगणना, स्थानिक कार्यक्रम, गाव पातळीवरील पुरस्कार सोहळे यासाठी शिक्षकच काम करीत असतात, त्याची कधी नोंद घेतली जाते का ? सरल ची माहिती भरताना तर अक्षरशः शिक्षक जेरीस आले. पोषण आहाराच्या हिशोबापायी तर एका शिक्षकाने आत्महत्या केली. बोर्डचे पेपर्सच्या स्लीपचा हिशोब जुळेपर्यंत एका शिक्षकाचे B.P.शूट होवून admit करावे लागले. बोर्ड मधील कर्मचारी सहकार्य करतात पण तीदेखील माणसेच आहेत. त्यांच्यावर देखील कामाच्या संख्येचा ताण असल्याने त्यांच्याही सहनशक्तीला मर्यादा पडतात.
      हे वरवर दिसणारे सर्व घटक झाले. सध्या प्रसार माध्यामामुळे आताची पिढी वाहवत चाललीय हे आपण ऐकतोय, पण याचे लोण शाळांपर्यंत येऊन पोहोचले आहे. शालेय पातळीवर आजपर्यंत नव्हत्या इतक्या भयानक आणि गुंतागुंतीच्या समस्या त्या मानसिक-शारिरिक-कौटुंबिक येऊन पोहोचल्यात. अशा गुन्ह्यामध्ये किंवा समस्येत सापडलेला विद्यार्थी -विद्यार्थिनी शिक्षकाला सापडली की मग त्याची शहानिशा, पालकांना बोलविणे इ. सर्व होईपर्यंत तो शिक्षक आणि घड्याळ यांचा संबंधच नसतो. स्वतःच्या मुलाप्रमाणे गुन्ह्यातून त्याला बाहेर काढण्यासाठी त्याला अर्थिक,भावनिक आधार देण्यासाठी शिक्षक त्याच्या परीने पालक-विद्यार्थी यांच्याशी संवाद साधत असतो. याचा हिशोब कधी कोणी मांडलाय का ?
      प्रत्येक वर्गात 60 ते 65 मुलं असली तरी प्रत्येक मुलाला कोणत्या पद्धतीने शिकवले पाहिजे हे ओळखून तो शिक्षक आपली एक शिक्षण पद्धती बनवितो. मग या पद्धतींची कोणी कधी दखल घेतं का? प्रत्येक शिक्षक हा स्वतःच्या अध्यापन शैलीत सतत नवनवीन GR अंगवळणी पाडून घेणारा एकमेव गरीब-प्रामाणिक सरकारी नोकर आहे. त्याचबरोबर सतत येणाऱ्या प्रयोगशील बदलांमुळे शासनाचे धोरण पालकांना समजून देण्यासाठी कसोशीचे प्रयत्न करत असतो. परंतू सतत बदल होत असल्याने शाळांवरील समाजाचा विश्वास कमी होत आहे व खाजगी इंग्रजी शाळांकडे प्रवेशाचा स्त्रोत वाढत आहे आणि अशावेळी विद्यार्थी संख्येत घट झाली तर त्याला देखील जबाबदार शिक्षकच धरला जातो.
      मा.शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांचे शिक्षणाचे तास किती या दैनिक सकाळ -सप्तरंग दिनांक 22 नोव्हेंबर मधील एक वाक्य उधृत करावे वाटते, 'कृष्णमूर्तींना एक लहान मूल प्रश्न विचारते की आम्हाला खेळण्यात जितका आनंद मिळतो तितका आनंद शाळेत का मिळत नाही ? कृष्णजी उत्तर देतात की बाळा तुझ्या शिक्षकांना जेंव्हा शाळेत आनंद मिळायला लागेल तेंव्हा तुलाही आनंद मिळेल.'
      हे कोटेशन याठिकाणी खूप मौल्यवान आहे. सतत उपक्रम, नोंदी,रॅली, उत्सव, गॅदरींग, सहल, udise वर शालेय माहिती भरणे,सरल, अल्पसंख्यांक फॉर्म, निवडणूक ड्यूटी, जनगणना ड्यूटी, विद्यार्थी वाहतूक नोंदी, चाचण्या पेपर्स, सहामाही, वार्षिक पेपर्स सेट करणे, वह्या तपासणे,शाळा बाह्य सर्वेक्षण इत्यादी जबाबदाऱ्या शिक्षकांवर दिल्या आहेत. परंतू शिक्षक संगणक तज्ञ नाहीत शिवाय बऱ्याच ठिकाणी क्लार्क भरती नसल्यामुळे आहे ती संख्या कामाच्या मानाने मर्यादीत आहे. शिवाय यासाठी लागणारी अत्याधुनिक तंत्रज्ञान व इतर सुविधांची कमतरता फार मोठ्या प्रमाणात आहे. या व अशा अनेक गोष्टींमधून शिक्षक आनंदी असेल का ?आणि मग कृष्णमूर्तींना अपोक्षीत असणारा आनंदी शिक्षक मिळेल का ?
     
      ज्याठिकाणी एका वर्गात 25 विद्यार्थी अपेक्षित आहेत, मग त्यांच्या नोंदी मूल्यमापन करणे-लिखित स्वरुपात ठेवणे सोपे आहे, तिथे 60 ते 75 पटाच्या नोंदी शिक्षकाच्या मानगुटीवर बसविल्या आहेत. त्याचप्रमाणे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरती बंद त्यामुळे प्रत्येक शाळेत अतिरिक्त कामाचा बोजा शिक्षकावर दिला जातो. मग यातून गुणवत्ता वाढ अशक्यच आहे. एवढं असूनही आमचे शिक्षक हे सर्व आनंदाने करत आहेत. पण उगाच कुणीही त्यावर सतत अविश्वास दाखवू नये. उलट त्यांनी केलेल्या चांगल्या गोष्टी समोर आणाव्यात असे मला वाटते.
      आदर्श शाळा व उपक्रमाविषयी माहिती निरनिराळ्या मासिकांमधून येते. यावेळी जिथे जिथे प्रयोग यशस्वी झालेत त्यांचे निरीक्षण केले तर आपणा सर्वांना हेच जाणवेल की कमी विद्यार्थी संख्या असणाऱ्या शाळांमध्येच हे प्रयोग घडलेले आहेत व यशस्वी झाले आहेत. जीव ओतून काम करणारे शिक्षक खूप ठिकाणी आहेत, पण कमी विद्यार्थी संख्या असणाऱ्या शाळाच यशस्वी होत आहेत. म्हणजेच या गोष्टीचा नक्कीच विचार करावा लागेल. म्हणून खरोखरच ज्यांना शैक्षणिक गुणवत्ते विषयी काळजी असेल त्यांनी मग नुसते शाळेचे तास वाढविणे योग्य नाही कारण शिक्षक हा जिवंत घटकावर काम करत असतो. त्यामुळे त्याची शारीरीक-बौद्धिक उर्जा खूप खर्च होते. 7 ते 8 तासांपेक्षा जास्त काम करणे अशा घटकाबरोबर केवळ अशक्य आहे. मुलांच्या सानिध्यात जास्तीत जास्त वेळ घालविण्यासाठी प्रत्येक शिक्षक उत्सूक आहे. नवनवीन प्रयोग करण्यासाठी तोही सतत विषयज्ञान वाढवत आहे (सध्याची साधारणपणे 26 ते 45 या वयोगटातील शिक्षकांची वृत्ती अनेक प्रशिक्षणात एकत्र आल्याने समजून आली. प्रत्येक शिक्षक अनेक ठिकाणहून गुणवत्ता वाढीसाठी जागरुक आहे. हे सत्य आहे.) जर त्याला अध्यापनाविषयीचेच काम दिले ,तर तो नक्की आनंदी होईल. शिवाय इतर कामांसाठी लागणारी त्याची उर्जा तो दुप्पट ताकतीने , वैज्ञानिक , लेखक , चित्रकार, खेळाडू, तंत्रज्ञ, कायदेतज्ञ बनविण्यात घालवेल.
      यासाठी वरील मुद्द्यांचा विचार व्हावा यामध्ये शिक्षकांची तक्रार नोंदवणे हा हेतू नसून शिक्षकांना अपेक्षित असणारे शैक्षणिक धोरणातील बदलच आहेत असे समजावे.   
       



                                                माधुरी अभय कुलकर्णी 

No comments:

Post a Comment