महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने
यापूर्वी एक स्वागतार्ह निर्णय जाहीर केला होता तो म्हणजे "दहावी नापास विद्यार्थ्यांना परत एक संधी दिली जाणार,
त्यांचे वर्ष वाया जावू देणार नाही." त्याप्रमाणे यावर्षीपासून त्याची अंमलबजावणी झाली. कांही कारणानं जर एखाद्याचे
वर्ष वाया जात असेल तर ते जाणार नाही. हे धोरण अनेक विद्यार्थ्यांसाठी पर्वणी
ठरले.
याचप्रमाणे शासनाची दुसरी स्वागतार्ह बातमी
8 सप्टेंबर सकाळ मध्ये वाचनात आली. "राज्यात यापुढे कुणीही दहावी नापास नाही." अनुत्तीर्णांना कल तपासून दिले जाणार कौशल्याधारित प्रशिक्षण. अनुत्तीर्ण
होणाऱ्या विद्यार्थ्यांना शालांत परीक्षेसाठी दोन संधी दिल्या जाणार आहेत आणि त्या
दोन संधीमध्ये देखील त्याला क्रमिक विषय सोडविता आले नाहीत तर त्याची कल चाचणी
घेण्यात येईल व मग त्याच्या अंगी असणाऱ्या कौशल्याचा विकास करणारा अभ्यासक्रम
त्याला दिला जाईल. शिवाय तसे कौशल्याचे प्रशस्तिपत्रक येत्या शैक्षणिक वर्षापासून
देण्यात येईल.
या बातमीतील भावना खरंच खूप शिक्षकांच्या
मनात होती. खूपवेळा असं डोळ्यासमोर दिसत होते आणि आहे की, 'अमुक एक विद्यार्थी कलाकुसरीच्या वस्तू छान बनवतोय' किंवा ती विद्यार्थिनी छान विणकाम करतेय. पण हे
विद्यार्थी अभ्यास विषयात अत्यंत मागास आहेत. कांही विद्यार्थ्यांना स्वतः अभ्यास
करायला आवडत नाही पण ते वर्ग छान सांभाळतात. त्यांच्याकडून अभ्यास करवून घेतात. मग
असे विद्यार्थी फक्त 10वी परीक्षेत नापास होत असतील तर आयुष्यात ते काहीच बनू
शकणार नाहीत का ? असा प्रश्न खरोखरच शिक्षक,पालक
सगळ्यांनाच पडायचा. यातून मग त्या विद्यार्थ्यांवर 10 वी पास होण्यासाठी खाजगी
शिकवण्या इ.ची जबरदस्ती सुरु व्हायची. यातूनही तो विद्यार्थी पास झाला नाही तर तो
नैराश्यग्रस्त व्हायचा. साहजिकच आपण 10 वी नापास म्हणजे जगण्यासच नालायक आहे अशी
मनाशी खुणगाठ बांधून तो आत्महत्त्येस प्रवृत्त व्हायचा. पण शासनाने जाहीर केलेले 'न नापासांचे धोरण' यासाठी अत्यंत गुणकारी ठरणार आहे.
रचनावाद किंवा आकारिक मुल्यमापन पध्दत
स्वीकारण्यापूर्वी आपण दुध+रॉकेल+पाणी = ---------- पदार्थ असेच म्हणत होतो.
म्हणजेच सर्व विषयांची एकत्र बेरीज करुन गुण ठरवत होतो. त्यातही कौशल्य विकसीत
करणारे जे विषय आहेत - चित्रकला, संगीत, कार्यानुभव, मातीकाम यांना अभ्यासक्रमात
दुय्यम स्थानच देत होतो व आहे. याचे उत्तम उदाहरण आपल्या डोळ्यासमोरच आहे.
सन 2012 पासून SSC चा अभ्यासक्रम आपण कार्यान्वित केलेला आहे त्यानुसार
कार्यानुभव अंतर्गत जवळजवळ 30 विषयांचा अभ्यासक्रम महामंडळाने तयार करुन दिला आहे.
हे विषय बहुतांशी पालक,शिक्षक, विद्यार्थी यांना ज्ञात असतील असे मला वाटत नाही.
..1..
इलेक्ट्रीक वस्तूंची दुरुस्ती, बेकरी
प्रॉडक्टस्, खाद्यपदार्थ टिकवण्याचे शास्त्र, पाण्याच्या पंपाची देखभाल दुरुस्ती,
दुग्धजन्य पदार्थांची निर्मीती, पौष्टीक खाद्य पदार्थ निर्मिती, बारीक प्रिंट,
शिवणकाम, सॉफ्ट टॉईज निर्मिती, शालेय वस्तू दुरुस्ती, साबण व डिटर्जन्ट बनविणे,
टाकाऊ पासून सजावटीच्या वस्तू बनविणे, भाजीपाला उत्पादन, बागकाम, नेमप्लेट बॅजेस
बनविणे, बायोगॅस आणि त्याचे उपयोग, प्लंबिंग, उपयोजित कला, लोकरकाम, लॉन्ड्री काम,
स्वयंपाक, मराठी-इंग्रजी टायपिंग, पिक उत्पादन, हरितगृह, बायडिंग, सुशोभिकरण,
मातीकाम, बांबूकाम, चित्रकला व रंगकाम, संगीत, वाणिज्य व बुक किपिंग, मासेमारी इ.
वैविध्यपूर्ण विषय पूर्वीच्या अभ्यासक्रमात आहेतच.
मग इतकी सोय जर आपल्याला महामंडळाने करुन
दिली होती तर त्याचे काय झाले? याचा उपयोग विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकसनात का झाला नाही ? तर एक शिक्षिका म्हणजेच हे सर्व कार्यान्वित करणारा
प्रणालीतला एक महत्वाचा दुवा म्हणून मी ज्यावेळी अवलोकन करते त्यावेळी असे दिसते
की, हे विषय श्रेणी देण्यापुरते मर्यादित राहीलेले आहेत. शिवाय या विषयांचे तज्ञ
शिक्षक/ प्रशिक्षित कुशल व्यक्ति आमच्याकडे नाहीत आणि सर्वात महत्वाचे नुसता
अभ्यासक्रम माहिती असून उपयोग नाही त्यासाठी असणाऱ्या भौतिक सोयी-सुविधा SSC बोर्डच्या शाळेकडे उपलब्ध नाहीत. शिवाय शाळेमध्ये
समुहाने ज्या विषयांचे अध्यापन सोपे जाईल व लेखी काम करुन घेता येईल असेच विषय
निवडण्याकडे शालेय व्यवस्थापनाचा कल असतो. हे सत्य नाकारता येत नाही.
विशेष शाळांमध्येच हे विषय आपल्याला
प्रभावीपणे कार्यान्वित झालेले दिसतात. उदा. चिखलगांवची रेणू दांडेकरांची शाळा.
(येथील विद्यार्थी इलेक्ट्रीकल वस्तू दुरुस्ती, निर्मिती शिकतात आणि
स्वयंनिर्भरतेसाठी स्वतःच्या गावातील घरांमध्ये लाईट फिटींग इ.करतात.
याठिकाणी हा प्रयोग यशस्वी झाला त्याप्रमाणे
तो जर सर्वच ठिकाणी यशस्वी झाला असता तर नविन धोरण आखण्याची गरज भासली नसती.
बदलेल्या धोरणानुसार जसे B.A.with English अशी आपण पदवी घेतो तशी S.S.C. with …………. असे प्रमाणपत्र मिळणार असेल तर ते
विद्यार्थी व महत्वाचे पालकांना आनंददायी ठरेल. कारण विद्यार्थ्यानी काय केले
पाहिजे हे हल्ली पालकच ठरवतात. जसं गणित विषयासाठी- बीजगणित भूमिती ला पर्याय
म्हणून सोप्या जाणाऱ्या सामान्य गणिताचा पर्याय महामंडळाने उपलब्ध करुन दिला. पण
बहुतांशी पालकांचा कल अजुनही बीजगणित, भूमितीकडेच आहे. याचे कारण पालकांना वाटते
की, पुढे आपलं मुल नक्कीच इंजिनिअर इ. बनणार.
त्यामुळे नविन अभ्यासक्रमाच्या रचनेत हा
मुद्दा विचारात घेणे किंवा पालकांसाठी प्रथम समुपदेशनाची गरज पडणार आहे.
..2..
"10 वी नापास कोणीही नाही " हे धोरण अंमलात आले तर खरोखरच त्याचा फायदा संपूर्ण देशाला होणार आहे.
ज्याच्या अंगी जे कौशल्य आहे त्याला योग्य गति मिळेल. सुशिक्षित बेकारांची संख्या
कमी होईल. प्रत्येक हाताला काम मिळेल. आपल्या परिसरात उपलब्ध कच्च्या मालापासून
स्थानिक गरजा भागविणेसाठी पक्का माल बनविला जाईल. कदाचित त्यातही पुढे नवनविन
तंत्रज्ञान वापरले गेले तर निर्यातीसाठी याचा फायदा होईल. महात्मा गांधीजींची
श्रमाधिष्ठित किंवा स्वयंपूर्ण खेड्याची कल्पना स्वयंपूर्ण देशात रुपांतरित होईल.
वरीलप्रमाणे विद्यार्थ्यांच्या कल चाचण्या घेतल्या व प्रशिक्षण दिले तर स्वतःच्या
व कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्याइतपत तो नक्कीच अर्थार्जन करेल.
आपल्याला याठिकाणी बहुविध बुद्धिमत्तेचा
सिद्धांत विचारात घ्यावा लागणार आहे डॉ.हॉवर्ड गार्डनर यांनी 1983 साली अध्ययन-अध्यापन
प्रक्रियेकडे पाहण्याचा नविन दृष्टीकोन मांडला आहे. त्यांच्या मते - प्रत्येक
व्यक्तित कमीतकमी सात वेगवेगळ्या बुद्धिमत्ता अस्तित्वात असतात. प्रत्येक
विद्यार्थ्यात कोणत्या ना कोणत्या बुद्धिमत्तेचे प्राबल्य असतेच. प्रत्येकाची
आपल्या प्राबल्याने आढळणाऱ्या बुद्धिमत्ता प्रकारानुसार शिकण्याची व आपल्या
वातावरणाला प्रतिसाद देण्याची वेगळी पद्धत असते. यानुसार अध्यापन केल्यास व
मूल्यमापन केल्यास ती व्यक्ति योग्य क्षेत्रात यशस्वी होते. या सिध्दांताचा
आपल्याला चांगल्या प्रकारे उपयोग करण्याची संधी बदलेल्या धोरणात करता येईल. फक्त
आता या नविन अभ्यासक्रमाची रचना, मांडणी कशी असेल हे महत्वाचे. योजना यशस्वी
तेंव्हाच होते जेंव्हा ती चांगल्या प्रकारे कार्यान्वित होते. या धोरणाच्या
यशस्वीतेसाठी काही गोष्टी अवश्य केल्या पाहिजेत त्या म्हणजे - विद्यार्थ्यांबरोबर
पालकांचे समुपदेशन, मुबलक भौतिक सुविधा, तज्ञ मार्गदर्शक (शिक्षक नव्हे) आणि
विद्यार्थ्यासाठी पुरेसा वेळ व धोरणातील सातत्य. ( म्हणजे फलश्रुति मिळण्यास काही वर्षे जावी
लागतील लगेच धोरणात बदल नको )
माधुरी
अभय कुलकर्णी
No comments:
Post a Comment