तावदेषा देवभाषा, देवी स्थास्यति भूतले ।
यावच्च वंशोsस्त्यार्याणां
तावदेषा ध्रुवंध्रुवा ।।
संस्कृतच्या बाबतीत एक सुभाषितकार
वरीलप्रमाणे गौरवोद्गार काढतो की या पृथ्वीतलावर जोपर्यंत नद्या, पर्वत इ. आहेत
तोपर्यंत ही देवभाषा प्रचलित राहील. खरोखरच ही देववाणी, गीर्वाणवाणी संस्कृत भाषा
अत्यंत मधुर आणि मंजूळ आहे. सध्याच्या काळात मात्र नित्य उपयोगात ती आणली जात
नाही. कर्नाटकातील मत्तुर या गावी मात्र ती आपल्याला जिवंत दिसते. हे एक खेडेगांव
आहे. मात्र याठिकाणी असणाऱ्या सर्व मंडळींची रोजची व्यवहार भाषा संस्कृत आहे. खरं
तर अनेक भाषांची जननी ही संस्कृत आहे. लॅटीन, जर्मनी, रशियन, रोमन या परकीय तर
हिंदी, काश्मिरी कानडी, उर्दू, मराठी इ.अनेक भारतीय भाषांमधील शब्दांची
व्युत्पत्ती आपल्याला संस्कृत भाषेत दिसते. या भाषेच्या साहित्याला 5000 वर्षांचा
अत्यंत प्रगल्भ इतिहास आहे. पण काळाच्या ओघात ती जपजाप्य -स्तोत्रे इ.पुरती
मर्यादित आहे असा घातक विचार पसरत गेल्याने ती मागे पडत गेली. खरं तर संस्कृत
भाषेएवढी नूतनता, रसिकता, वैज्ञानिक दृष्टी, कलात्मकता कोणत्याच भाषेत नाही. फक्त
बऱ्याच ठिकाणची उदाहरणे ही गोष्टीरुपात साहित्यात पेरली गेल्याने आपला त्यावर
विश्वास बसत नाही. राक्षस-देव यांच्या युद्धात- डोळे शस्त्रक्रिया करुन बसविले,
रामायणात- पुष्पक विमान वापरले, महाभारतातील मयसभेची रचना, कणाद ऋषिंचा पिलवः
पिलवः करत प्राण सोडल्याचा दाखला, कोsरुक कोsरुक (निरोगी कोण आहे) असे म्हणत
फिरणारा पक्षी - ( आयुर्वेदाचा
मोठा मंत्र सांगून जातो - हितभूक, मितभूक, ऋतभूक ...
वरील सर्व
उदाहरणांचा जर आपण अभ्यास केला तर लक्षात येईल की "काखेत कळसा आणि गावाला वळसा" अशी आपली स्थिती झाली आहे. आपला जो
'प्रगल्भ वारसा' rich heritage तो आपण विसरत चाललो आहे. 1991 आणि
2001 साली झालेल्या जनगणनेनुसार अनुक्रमे 49736 आणि 14135 लोकच संस्कृत ही आपली
मातृभाषा म्हणून वापरतात.
मग जर ही
भाषा आपल्याला मृत होण्यापासून वाचवायची असेल तर सर्व स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे. परकीय
विद्यार्थी, विद्यापीठे येऊन आपलाच कच्चा माल नेऊन पक्का करुन आपल्याला नवीन आवरणात-आकर्षकरित्या
सादर करतात आणि आपण ते पहात बसतो हे कितपत योग्य आहे ?
खरं तर
संस्कृत भाषा ही राष्ट्रभाषा व्हावी अशी राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब
आंबेडकर यांची खूप इच्छा होती. डॉ.आंबेडकर हे संस्कृत विषयाचे अत्यंत चांगले
जाणकार होते. संस्कृत भाषा आपली आहे व ती रहावी यासाठी त्यांनी संसदेत
संस्कृतमधूनच विचार मांडले होते पण काही कारणास्तव हा विचार मागे पडला.
सध्याच्या
परिस्थितीत पाहिले तर संस्कृतभाषा ही शाळाशाळांमधून शिकविली जाते. भारतातील कार्यरत
असणाऱ्या प्रत्येक विभागीय मंडळांची याबाबतीतली भाषा रचना मात्र भिन्न आहे. काही
विभागांनी तिला व्दितीय भाषा म्हणून स्वीकारली आहे. काही विभागांनी तृतीय भाषा
म्हणून तिचा स्वीकार केला आहे. काही ठिकाणी ही भाषा 6 वी पासून शिकविली जाते तर
काही ठिकाणी ती 8 वी पासून परिचित होते. महाविद्यालयीन व उच्च शिक्षणाच्या बाबतीत
विचार केला तर भारतात संस्कृतसाठी अनेक विद्यापीठे कार्यरत आहेत. पण या
विद्यापीठांना चांगले विद्यार्थी कमी पडत आहेत. यासाठी माध्यमिक स्तरावर अनेक बदल
घडणे आवश्यक आहे. माध्यमिक स्तरावर विद्यार्थी फक्त गुण मिळवून देणारी भाषा एवढाच
मर्यादित विचार तिच्या बाबतीत करतात.
सन 2014-15
पासून संस्कृत विषयाच्या बाबतीत एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला की संस्कृत
विषयाची प्रश्नपत्रिका नको तर तिची कृतिपत्रिका असावी. 14-15 पासून आठवी-नववी तर यावर्षी
इयत्ता 10वी साठी हा बदल सर्वत्र ग्राह्य धरला आहे. हा बदल अत्यंत सकारात्मक आहे.
ज्याप्रमाणे इंग्रजीची प्रश्नपत्रिका इंग्रजीमध्ये , हिंदीची हिंदी मध्ये आहे
त्याप्रमाणे संस्कृतची संस्कृतमध्ये. यामुळे विद्यार्थी व शिक्षक संस्कृत भाषा परत
एकदा संवादात, रोजच्या वापरात आणतील, छोटी छोटी वाक्ये बनवतील अशी अपेक्षा आहे.
याठिकाणी एक मोठी दरी अशी निर्माण झाली आहे की आत्ता जे शिक्षक या विद्यार्थ्यांना
शिकवत आहेत ते जेंव्हा शिकले त्यावेळी आठवीपासून उच्चशिक्षणापर्यन्त संपूर्णपणे
भाषांतर पद्धतीनेच शिकविले जात होते. त्यांच्यासाठी हा communicative approach अत्यंत नविन आहे. राष्ट्रीय
संस्कृत संस्थान नवी दिल्ली, संस्कृत भारती अशा काही संस्थांचे यासाठी पत्रद्वारा,
प्रशिक्षणे, संभाषण वर्ग उपलब्ध आहेत. याचा नक्कीच उपयोग शिक्षकांना होईल. जर आपण
अजूनही दूरदृष्टीने विचार केला तर अशा प्रकारे संस्कृत शिक्षित होणाऱ्या
विद्यार्थ्यांना अनेक क्षितिजे खुली होतील.
जगाला
मार्गदर्शक असणारी आयुर्वेद ही पद्धती भारताकडेच आहे. सध्या आयुर्वेदातील उपचार
पद्धतीवर संशोधन सुरु आहे. गणितातील अनेक क्लिष्ट संकल्पनांचा विचार
भास्कराचार्यांनी लिलावती ग्रन्थात केलेला आहे. त्याचे पुनरोज्जीवन करणे आपल्याच
आतात आहे. धातूमिश्रणशास्त्रा विषयी संस्कृतमध्ये अनेक ग्रन्थ उपलब्ध आहेत. दिल्ली
येथील स्तूप हजारो वर्षे झाले तरी अजूनही ऊन, पाऊस, थंडी झेलत आहे. ज्योतिषशास्त्र
हे अत्यंत शास्त्रीय बैठक असणारे श्सात्र आहे. तारांगणातील अनेक ग्रहांचा प्रभाव
ऋतुमान, मानवी जीवन, पशुपक्षी, प्राणी यांवर कसा पडतो याचे विवेचन आहे. उत्तम
पुरुष लक्षणे, वास्तु बांधणीसाठी चांगली जमीन कशी निवडावी, उत्तम अश्व कसा
निवडावा, विमान बांधणी, जहाज बांधणी, कृषिकर्म, नाट्य, साहित्य, संगीत एक ना अनेक
विषय संस्कृतात आहेत. आर्यचाणक्यांचा अर्थशास्त्र ग्रंथ तर आजही प्रत्येक
अर्थतज्ञांनी संदर्भग्रन्थ म्हणून वापरावा. संस्कृत ही भाषा व्याकरण दृष्ट्या
जर्मन भाषेशी साधर्म्य असणारी आहे त्यामुळे जर्मन भाषा संस्कृत येणाऱ्यांना लवकर समजते.
या सर्व
प्राचीन ग्रन्थ संपदेतून संशोधन करण्यास खूप वाव आहे. आपले विद्यार्थी फक्त काहीच
क्षेत्रांकडे ( इंजिनिअर व मेडिकल अँलीओपॅथी) आपली शक्ती लावत आहेत.
कित्येक
वर्ष हळद ही घराघरात वापरली जायची. तिच्यातील अनेक गुण आपल्याला माहिती होते. पण
अमेरिकेने त्यावर जेंव्हा मालकी हक्क सांगितला त्यावेळी आम्हाला जाग आली.
मा.डॉ.माशेलकर यांनी यासाठी खुप मोठा लढा देऊन याची मालकी भारताकडे ठेवली. पण अशा
अनेक गोष्टी आमच्याच आहेत पण त्या आम्हाला माहित नाहीत अशी आमची अवस्था आहे.
या
क्षेत्रांची माहिती करुन घेऊन शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांच्यात (माध्यमिक
गटातच) संस्कृतची आवड व जागृती निर्माण केली पाहिजे नाहीतर हा आपला ठेवा नष्ट होईल
व हळहळ करण्याव्यतिकीक्त आपण काहीच करु शकणार नाही. आज माध्यमिक स्तरावर अशा अनेक
शाळा माझ्या पाहण्यात आहेत की त्याठिकाणी असणारा संस्कृत विषय -संस्कृत शिक्षक
नसल्याने बंद पडला आहे. खरं तर प्रत्येक भारतीयाला जशी हिंदी-राष्ट्रभाषा,
मातृभाषा येते तशी संस्कृत आलीच पाहिजे. त्यासाठी आत्ताच्या संस्कृत जाणकारांची
खालील भूमिकाच असली पाहिजे.
समर्पयामि
संस्कृताय जीवनम् ।
माधुरी अभय कुलकर्णी
No comments:
Post a Comment