जुलै महिन्याच्या 4 तारखेस शासन आदेशाने साधारणपणे सव्वा लाख कर्मचारी
शालाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणासाठी कार्यरत झाले.यातून 50000 विद्यार्थी
शालाबाह्य विद्यार्थी सापडले. पण यावर बरीच वादळे उठली की हे शक्यच नाही. समाज
कार्यकर्ते श्री.हेरंब कुलकर्णी यांनी स्वयंसेवी संस्था इ.मदतीने
पुर्नसर्वेक्षणाचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यासमोर मांडला. त्याला मान्यताही मिळाली. 1
ऑगस्टला पुनः सर्वेक्षणासाठी किंवा शालाबाह्य जी आधी शोधलेली मुले आहेत त्यांना
शाळेत आणण्यासाठी शिक्षक बाहेर पडले. याचा परिणाम काय झाला ? हे सर्वेक्षण
यशस्वी झाले का ? त्या मुलांना आपण टिकवू शकू का ? या सर्व
प्रश्नांची उत्तरे काय येतील हे मला माहित नाही पण ......
1 ऑगस्ट रोजी पूर्वी आमच्या शाळेत
दाखल अशा सर्वेक्षणात आलेल्या विद्यार्थीनींच्या शोधात मी व माझे काही सहकारी
बाहेर पडलो. कराड-शहरी भाग आहे. शहराच्या मध्यभागी मोठी झोपडपट्टी आहे.
त्यातील या सर्व विद्यार्थिनी होत्या. आमच्या काही विद्यार्थिनी सुध्दा इथेच
राहणाऱ्या होत्या. त्यांच्या मदतीने या मुली आम्ही शोधून काढल्या. अगदी शिक्षकी
भाषेत आम्ही त्यांच्याशी बोलू लागलो. "बाळांनो रोज शाळेत यायचं तुम्ही उद्यापासून आमच्या
शाळेत या. शाळेत पुस्तके मिळतात,खिचडी छान असते ........ इ."
हे सगळं सांगत असताना त्याठीकाणी 15 एक मुलींचा घोळका आमच्या भोवती जमा
झाला.
एका विद्यार्थिनीचे आमच्याकडे नांव
होते पण ती तिथं नव्हती. वय वर्षे 11. तिच्या वडीलांची गाठ पडली. त्यांना खूप
समजावले. उद्यापासून कन्येला शाळेत पाठवा. "आमाला शाळा शिकवायची नाय, पाठवणार नाय काय शिकून उपेग
नाय"
दुसऱ्या दोन मुलींच्या पालिका भेटल्या. त्यांनी सांगितल,तिला सकाळी
धुणंभांड्याच्या कामावर जायला लागतं त्यामुळे ती शाळेत येणार नाही. पालिकांना
शिक्षणाचं महत्व सांगीतलें. कश्याबश्या त्या तयार झाल्या. या मुली 11 वर्षाच्या, 13
वर्षाची एक मुलगी, 5 वी तून शाळा सोडली. तिला बोलवून आणली. तिनं तोंडाला ओढणी
बांधलेली. तिला विचारलं शाळेत का येत नाहीस,ती काहीच बोलली नाही. दुसऱ्या मुलींनी
सांगीतले,"बाय ती तमाशात नाचाया जाती"
या सर्वावर आम्ही त्यांना थोडी सूट दिली. काम खूप असेल तेंव्हा येवू नका, काम
उरकून शाळेत या. बुडलेलं आम्ही करुन घेवू. दुसरे दिवशीपासून त्या मुली शाळेत यायला
लागल्या. दोन दिवस व्यवस्थित आल्या. परत इयत्ता 6 वी मधील एक बालिका गायब झाली.
तिच्या वयाची दुसरी त्या इयत्तेतीलच दिवसभर रडत होती. विचारपूस केल्यावर कळले तिच्या
मैत्रीणीला शाळेत यायचं आहे पण वडील दारु पितात.त्यांनी सांगीतलय रोज 100 रुपये
मला द्यायचे आणि शाळेत जायचं. आई शाळेत पाठवायला तयार आहे पण वडील नाहीत. दोन दिवस
ती शाळेत आली आणि वडीलांनी लाथाबुक्क्यांनी तिला अक्षरशः तुडवलं.
13 वर्षाच्या तमाशात जाणाऱ्या
मुलीचं काय झाल तर ती आलीच नाही. इतर मुली छोट्या होत्या त्यांना विचारलं तर त्या
महणाल्या बाय तिला घेऊ नका ती वंगाळ वागती.
इतक्या सगळ्या या चिमुकल्या
जिवांच्या अडचणी असताना आपण काय शिकवणार त्यांना ? शाळाबाह्य मुलांना दाखल करुन
घेणं,आणणं ही इतकी सोपी गोष्ट नाही. कारण आम्हांला ज्या मुली सापडल्या त्यातील
बऱ्याच जुलैच्या सर्वेक्षणातल्या नव्हत्या.
जरी आपण शासनावर दोष
ठेवला,कर्मचाऱ्यांवर ठेवला तरी सत्य असे आहे की या परिसरामध्ये आपण जेंव्हा नावे
घ्यायला जातो तेंव्हा खरी माहिती देण्यास पालकच तयार नाहीत. या वस्त्यांमध्ये
घरांची रचना अशी आहे की, कोणत्या घरात किती माणसं,कुठली माणसं राहतात हेच समजत
नाही. या ठिकाणच्या मुलींची, मुलांची वय निश्चीत नाहीत. कारण बऱ्याच प्रससूती या
अजुनही घरातच होताहेत.
ज्या ठिकाणी संध्याकाळची चूल
पेटण्याचा मोठा प्रश्न आहे तिथं शिक्षण फार लांब राहतं,शिवाय इतके विचार मनात
येतात की यांना आपण शाळेत बसविलं आणि या मुलींना संध्याकाळचं घरातीलच दृष्य आठवत
असेल...... घरातील मारानं अंग ठणकत असेल....तर नुसतं त्यांना शाळेत आणून काय उपयोग
? कारण त्यांनी मनानं शाळेत हजर राहणं जास्त महत्वाचे आहे. यावर उपाय केला
पाहिजे आणि हे सर्व वेळखाऊ, नागमोडी कसरत आहे.
या सर्व कसरतीतून आपल्याला शिक्षण
सर्वांना शिक्षणाच्या प्रवाहात आणायचे आहे. श्री. हेरंब कुलकर्णी, सौ.स्मीता
देशपांडे (जडण-घडण) यांनी लिहीलेले यावरील विवेचन छान आहे.
यामधून मला कोणाचीही बाजू मांडायची
नाही. पण या सर्वेक्षणाचा झालेला फायदा मात्र मी लिहू शकते. शिक्षक/कर्मचारी या
मुलांच्या घरापर्यंत पोहोचला. त्याच्या अडचणी स्वतः पाहिल्या.(काही कर्मचारी
उंटावरचे असतात त्याचा विचार इथे नको करुयात) आज माझ्या शाळेत 5 विद्यार्थीनी 5
वीत आणि 2 विद्यार्थीनी 6 वीत यायला लागल्या. हे सुध्दा खूप मोठे साध्य आहे. मला
खात्री आहे त्यांच्या संगतीने अजून मुली शाळेत नक्की येतील.
यावर्षी त्याच्यामध्ये शैक्षणिक
फारसा बदल झाला नाही तरी चालेल.यावर्षी आकारिक व संकलित मुल्यमापनाने नापास कोणास
करायचे नाही हा नियम यांना नको लावूयात.त्यांना त्याच इयत्तेत बसविण्याची परवानगी
द्यावी कारण गेले वर्ष दोन वर्ष यांच्या शिक्षणात खंड पडलेला आहे.
चांगले बोलणे, स्वच्छ राहणे, आपला
परिसर स्वच्छ ठेवणे, चांगले वागणे एवढा बदल झाला तरी सर्वेक्षणाचा फायदा झाला असे
मी म्हणेन....
सौ. माधुरी अभय कुलकर्णी
No comments:
Post a Comment