Saturday, 3 September 2016

स्मार्ट खेड्यांकडे चला

प्रस्तावना

       सध्या स्मार्ट हा शब्द अगदी सतत कानावर पडतोय. रोजच्या वर्तमानपत्रात एकतरी बातमी या स्मार्ट वर असतेच. त्यातही स्मार्ट सिटी योजना हा तर आपल्या औत्सुक्याचा विषय झालाय. मग विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट म्हणजे आपण थोक्यात काय सांगू शकतो तर -
       सर्व काही जिथल्या तिथे व्यवस्थित आणि नीटनेटकेपणाने असणे म्हणजे 'स्मार्ट' ही कल्पना. मग स्मार्ट सिटी किंवा शहरांना स्मार्ट करायचे म्हणजे काय ? तर शहरातील प्रशासकीय सेवांसाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर झाला पाहिजे. नागरी सुविधा वाढल्या पाहिजेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कार्यक्षम व स्वस्त,दर्जेदार शिक्षण विविध क्षेत्रांतील उद्योग आकर्षित त्याठिकाणी होवून रोजगार निर्माण झाला पाहिजे. अशा शहरांना आपण स्मार्ट म्हणणार आहोत मग अशी शहरे सध्या अस्तित्वात नाहीत पण नियोजनबद्धपणे त्यांचे रुपांतर अशा स्मार्ट शहरांमध्ये करता येणार आहे अशी 100 शहरे शासनाने या आराखड्यात गृहीत धरली हेत. अशा स्मार्ट शहरांमध्ये सर्वांगीण विकासाकरीता अद्ययावत माहिती तंत्रज्ञानाच्या साधनांचा उपयोग केल्यामुळे शहरी-गरीब आणि वंचित घटकांना अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
       हा सर्व झाला भविष्यकाळ. पण वर्तमान काळात काय परिस्थिती आहे हे होऊ घातलेल्या नागरिकांसमोर म्हणजेच आताच्या विद्यार्थ्यांसमोर आणण्यासाठी आम्ही शालेय सत्रावर एक सर्वेक्षण केले.

उद्दिष्टे

1.     विविध क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांची माहिती गोळा करणे.
2.     त्यांचे शिक्षण, कामाचे ठिकाण, स्वरुप, वेळ, अडचणी, फायदे, यांची माहिती घेणे.
3.     स्वतःच्या गावात नोकरी न करण्याची कारणे जाणून घेणे.
4.     कमाल तरुणांची संख्या बाहेरगावी / परदेशी असल्याने कुटुंब व्यवस्थेवरील त्याचा परिणाम जाणून घेणे.
5.     आरोग्यावर झालेला परिणाम.
6.     मोठ्या शहरांवर व खेड्यांवर लोकसंख्येच्या स्थलांतराने झालेल्या परिणामांचा अभ्यास करणे.
7.     सर्व समस्या विद्यार्थिनींना माहिती करुन देणे व आपले करिअर निवडताना योग्य दिशा मिळवण्यासविचार प्रवृत्त करणे.
8.     कल चाचणीचे गांभीर्य लक्षात आणून देणे.

कार्यवाही
       दिवाळीपूर्वी विद्यार्थिनींना आपण करत असलेल्या प्रकल्पाची माहिती दिली. त्याचप्रमाणे त्याचे महत्व पटवून दिले. विद्यार्थिनींच्या मदतीने प्रश्नावली तयार केली. सुट्टीला जाण्याच्या आदल्या दिवशी विद्यार्थिनींना प्रश्नावली छापील स्वरुपात दिली. त्याचप्रमाणे माहिती गोळा करताना प्रश्नावली सोबतच मुलाखतीचे मुद्दे ही त्यांना स्पष्ट केले. मुलाखत ही अकृत्रिम कशी होईल याकडे कटाक्षाने लक्ष देण्यास सांगितले.
*      एकूण 200 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले.
*      सुट्टी संपल्यावर प्रश्नावलीवरुन माहिती संकलन केले व माहितीचे विश्लेषण केले.    

       स्व.शे.रामविलास किसनलाल लाहोटी कन्या प्रशालेतील 9अ च्या विद्यार्थिनींकडून व्यक्तीमत्व विकास अंतर्गत उपक्रम करुन घेतला आहे त्याचा हा आढावा. दिवाळीपूर्वी 67 विद्यार्थिनींनी कराड व कराड तालुक्यातील 200 घरांचे सर्वेक्षण केले. यासाठी प्रश्नावलीचा व मुलाखत तंत्राचा वापर केला. या सर्वेक्षणामध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या 22 ते 45 या वयोगटातील कुटुंबांची व कुटुंब प्रमुखांची माहिती गोळा केली.
       सर्वेक्षणातून मिळालेल्या माहितीनुसार नोकरी निमीत्त 200 कुटुंबापैकी
       बाहेरगावी नोकरी करणाऱ्यांची नोकरीची ठिकाणे खालीलप्रमाणे आहेत.

ठिकाण
टक्केवारी
पूणे
42
मुंबई
13
परदेश
4
दिल्ली
1
कोकण,सातारा,सांगली व इतर शहरे
40

       कराड व कराड परिसरातून पूणे शहरात सर्वात जास्त स्थलांतर झालेले दिसून येते.
       सर्व लोकांच्या शिक्षणाचा आढावा घेतला तर
      
कार्यक्षेत्र
टक्केवारी
इंजिनिअरींग,कॉम्पूटर,आय.टी.इ.
58
वैद्यकीय
7
शासकीय
14.5
आर्मी व पोलीस दल
3.5
कलाक्षेत्र
1
फॉरेन लँग्वेजेस
0.5
इतर
15.5

       सर्वात जास्त कार्यक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्ती या इंजिनिअरींग क्षेत्रात आहेत.

       बाहेरगावी नोकरी स्वीकारण्याची कारणे-
      
कारणे
टक्केवारी
गावाकडे शिक्षणाला योग्य संधी नाही
68.5
पगार कमी
13.5
इतर
17



       स्थालांतरित झालेल्य़ा कुटुंबामध्ये कौटूंबिक जबाबदारी कोण स्वीकारते ?
           
कौटुंबिक जबाबदारी
टक्केवारी
आजी-आजोबा घर सांभाळतात
17
कामाला बाई
7
पाळणाघर
12
इतर
2
बायको नोकरी करत नाही
62
      
       सर्व घरातील तरुणी या चांगल्या प्रकारे शिक्षीत असून कौटूंबिक जबाबदारीमुळे कोणत्याही 
       कार्यक्षेत्रात काम करीत नाहीत.
       राहत्या घरापासून नोकरीच्या ठिकाणी प्रवासाचा कालावधी अधिक कामाचे तास
      
कामाचे + प्रवासाचे तास
टक्केवारी
10
53.5
8
44.5
6
2

       नोकरीच्या ठिकाणी जाणेयेणेसाठी वापरली जाणारी वाहन व्यवस्था

      
वाहने
टक्केवारी
दुचाकी
35.5
चारचाकी
17.5
ऑफिसची गाडी
16.5
सार्वजनिक वाहन
30.5

       गावात नोकरी उपलब्ध झाल्यास स्वीकाराल का ? हो म्हणणाऱ्यांची संख्या 94 आहे. बाकीचे 
       गावाकडे येण्यास तयार नाहीत.
       गावात नोकरी स्वीकारण्याचे कोणते फायदे आहेत ?
       फायदे
टक्केवारी
कुटुंबाबरोबर राहता येईल
60
शेती करता येईल
8.5
खर्चाची बचत होईल
25
इतर
6.5
      


        नोकरीच्या गावातील अडचणी व समस्या
      
       अडचणी
टक्केवारी
वाहतुकीची समस्या
39
धावपळ,निकृष्ठ जेवण इ.समस्या
19
महागाई
12.5
घराकडे दुर्लक्ष
17.5
इतर
12

       गावाकडे कोणत्या स्वरुपाचे व्यवसाय उद्योगधंदे, कंपन्या सुरु व्हाव्यात.
      
       स्वरुप
संख्या
आय.टी.कंपन्या,कॉम्प्यूटरशी संबंधित
भरपुर पगार असणाऱ्या कंपन्या
72.5

मुंबई, पुणे महानगरांसारख्या कंपन्या
19.5
कौशल्यावर आधारीत व्यवसाय सुरु व्हावेत
8

       वृद्धांच्या अपेक्षांना योग्य न्याय देवू शकत नाही असे म्हणणारे 61 टक्के लोक आहेत.

       नोकरी करुन आल्यावर पत्नी, मुले यांच्यासाठी योग्य वेळ देवू शकत नाही असे म्हणणारी 57.5 टक्के लोक आहेत. तर या दगदगीच्या जीवनामुळे 44 टक्के लोकांना आरोग्याच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत.
       चिंतन -
       आपणांस वरील माहितीवरुन लक्षात येते की, कराड व कराड परीसरातून सर्वात जास्त स्थलांतर पूणे शहरात झाले आहे. शिक्षणाला योग्य सेंधी नाहीम्हणून अनेक कुटुंबे स्थलांतर करत आहेत. अर्थातच आजूबाजूची खेडेगावे ओसच पडत आहेत त्यामुळे स्थावर मालमत्तेचे नुकसान होत आहे. एकीकडे ही परिस्थिती आहे तर मोठ्या शहरांमध्ये लोकसंख्येचा अतिरिक्त बोजा पडत आहे. या सर्वाचा परिणाम तेथील नागरी सुविंधावर होत आहे. पूणे मुंबई सारख्या शहरांमध्ये पाण्याचा, जागेचा तुटवडा भासू लागल्याने आजूबाजूच्या उपनगरातून शेतजमिन बांधकामासाठी वापरली जात आहे त्यामुळे अन्नधान्य उत्पादन करण्यास शेतजमिन कमी पडत आहे. गावाकडे तरुण मंडळींची कमतरता निर्माण झाल्याने शेती व वृद्ध माणसांच्या देखभालीचा प्रश्न गांभीर्याने निर्माण होत आहे. शहरांमध्ये आई-वडिल दोघेही नोकरीसाठी बाहेर असल्याने घरातील छोट्या मुलांचा प्रश्न गंभीर रुप धारम करत आहे. भारताची पारंपारीक एकत्र कुटुंब पद्धती मोडकळीस येत आहे. संस्कार, प्रेम, भावना जपणूक, घरचा पौष्टीक हार या गोष्टी दुरावत चालल्या आहेत.
         56.9 टक्के स्त्रीया मुलांच्या संगोपनासाठी नोकरी अथवा करीअर करु शकत नाहीत. मग या स्त्रीयांच्या शिक्षणासाठी वैयक्तिक व शासकीय केलेली गुंतवणूक वाया जात आहे. याचा गांभिर्याने विचार होणे गरजेचे आहे. राहत्या घरापासून कामाचे ठिकाण लांब आहे शिवाय नोकरीचे तास कमीतकमी 10 तास असल्याने कुटुंबाला व्यायामाला व स्वतःच्या छंद जोपासण्याला वेळच मिळू शकत नाही. नोकरीच्या ठिकाणी येण्याजाण्यासाठी वैयक्तिक दुचाकी व चारचाकी वाहनांचा वापर करण्याकडे जास्त कल आहे. त्यामुळे वाहतूक जाम व प्रदुषणाचा मोठा प्रश्न निर्माण झाल्याचे दिसत हे. या सर्वाचा परिणाम 22 ते 45 या वयोगटातील लोकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. तरीदेखील योग्य उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे 53 टक्के लोक गावाकडे येण्यास तयार नाहीत.
       सर्वात महत्वाचा सर्वेक्षणातील मुद्दा असा दिसतो की शेती करण्याची इच्छा व शेतजमिन उपलब्ध असणाऱ्यांची संख्या ही अगदीच नगण्य आहे. टक्केवारी नुसार 8.5 टक्के लोकच उत्पादन करु शकतात आणि खाणाऱ्यांची संख्या मात्र 92.5 टक्के आहे. यावरुन अन्नधान्य टंचाई निर्माण होईल यात वादच नाही.
       वरील सर्व गोष्टींचा परामर्श घेतल्यास असे वाटते की, स्मार्ट शहरे निर्माण करण्याकडे जेवढे लक्ष दिले जात आहे तेवढेच स्मार्ट खेड्यांकडे अथवा ठराविक विकसनशील कराड, सातारा, सांगली सारख्या शहरांकडे देण्यात यावे. ( आम्हाला माहित असलेले व सर्वेक्षण करण्यास सोईचे म्हणून कराड शहर निवडले अशी प्रातिनिधीक अनेक गावे भारताच्या कानाकोपऱ्यात आहेत व त्याठीकाणीही हीच अवस्था थोड्याफार फरकाने निदर्शनास येईल यात शंका नाही.) सर्व व्यवसाय, कंपन्या,शिक्षण क्षेत्रे यांचे काहीच गावांमध्ये केंद्रीकरण झालेले दिसते. त्यांचे विकेंद्रीकरण होणे महत्वाचे आहे. तरच पूणे-मुंबई कडे जाणारा लोकसंख्येचा भार कमी होईल. शिवाय प्रगत महाराष्ट्र योजनेअंतर्गत कौशल्यावर आधारित उद्योगधंदे, व्यवसाय सुरु झाल्यास शेतीला पूरक अर्थप्राप्ती होईल.
       सर्वेक्षणातून सर्वात जास्त लोक इंजिनिअरींग क्षेत्रात काम करत आहेत. या अनुषंगाने अनेक महाविद्यालये या 10 वर्षात ठिकठिकाणी उभी केली गेली. परंतू आता मात्र इतक्या रोजगार संधी उपलब्ध नसल्याने इंजिनिअरींग कडे जाणाऱ्यांची संख्या घटत आहे व पदवीधारक व पदवी देणारी महाविद्यालये बंद पडत आहेत.
       गावाकडची लोकसंख्या गावाकडेच राहील्याने वेळ व इंधन बचत होईल. त्याचप्रमाणे आपल्याकडे वैयक्तिक वाहन व्यवस्थेवर जास्त भर दिला जातो. यासाठी उद्बोधन करण्याची गरज आहे. एका माणसासाठी चारचाकी वापरणे हा प्रेस्टीज इशू केला जातो. परंतू तसे न होता सार्वजनिक वाहतुकीचा वापर केला गेला पाहिजे किंवा कार पुलींगचा वापर होणे गरजेचे आहे. प्रगत महाराष्ट्र योजने अंतर्गत रस्ते, बंदर विकासासाठी 73 हजार कोटी रुपयांची योजना आखली जात आहे. यातूनच जर जलद गतीने आणि सर्वदूर अशी वाहतूक व्यवस्था लोकांसाठी उपलब्ध करुन दिली तर वरील सर्व प्रश्न मिटतील. छोटी छोटी गावे सुद्धा हवाई वाहतूक, मेट्रो सेवांनी जोडली व स्ट्रॉंग नेटवर्कींग खेड्यांपर्यंत आणले तर मल्टीनॅशनल कंपन्यांना विकसनशील गावात कंपन्या उभ्या करता येतील व गावाकडील मनुष्यबळ गावातच स्थिरावेल.
       महात्मा गांधीजींनी सांगीतलेली मूलोद्योग, व स्वयंपूर्ण खेड्यांची रचना पुन्हा एकदा साकारली जाईल.
       यातून अजूनही एक महत्वाचा मुद्दा दिसतो तो 17.2 टक्के कुटुंबातच आजी-आजोबा रहात आहेत. नातवंडांचा सांभाळ करत आहेत. मग अमेरिकेसारखी कौटुंबिक परिस्थिती आपल्याकडे निर्माण होण्याची शक्यता बळावत आहे. अमेरिकेतील अनेक वृद्ध जोडप्यांकडे पुष्कळ पैसा हे पण भावना वाटून घेण्यासाठी, देखभाल करण्यासाठी विश्वासातली रक्ताची माणसे उपलब्ध नाहीत.
  
       हे सर्व सर्वेक्षण 9 वी च्या विद्यार्थिंनीकडून करुन घेण्यामागची भूमिका काय होती ? शासनाकडून सध्या शैक्षणिक क्षेत्रात एक नवी योजना राबविली जाणार आहे ती वरील सर्व गोष्टींना उपचारात्मक ठरेल. इयत्ता 9 वी तून 10 वीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची कल चाचणी घेऊन त्यांची ज्या विषयांमध्ये गती आहे त्या विषयात त्यांना शिकण्याची मूभा दिली जाणार आहे. मग यातूनच स्वतःच्या अंगी असणाऱ्या गुणांची, कौशल्यांची माहिती विद्यार्थिंनींना होणार आहे. म्हणूनच सत्य परिस्थिती व समस्या योग्य वयात विद्यार्थिंनीच्या समोर मांडल्या तर योग्य करीअर निवडण्यासाठी त्या प्रवृत्त होतील हे नक्कीच व त्यामुळेच 2020 साली अब्दूल कलामांच्या स्वप्नातील तरुण पिढीचा योग्य मार्गक्रमण करणारा भारत देश निर्माण होईल.( या सर्वेक्षणासाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका,सर्व अधिकारी व माझ्या लाडक्या 9 वी अ च्या विद्यार्थिनींचे व पालकांचे अनमोल सहकार्य लाभले)  


                                       माधुरी अभय कुलकर्णी 

No comments:

Post a Comment