Friday, 2 September 2016

आठवीच्या संपूर्ण संस्कृत पाठ्यपुस्तकाची समीक्षा

2012 सालापासून इयत्ता 9 वी 10 वी चा अभ्यासक्रम टप्याटप्याने बदलणार याची कल्पना होती आणि तसे झाले. 9वी,10वी ची संस्कृतची नविन पुस्तके पाहण्याची उत्सुकता होती. 10 जून 2012 ला महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी प्रकाशित केलेली संपूर्ण संस्कृत इयत्ता 9 व 10वी, संयुक्त संस्कृत इ.9 व 10वी ही पाठ्यपुस्तके मिळाली. आता या बदललेल्या पाठ्यपुस्तकांचे स्वरुप अत्यंत रंजक बनविले आहे. काळानुरुप आवश्यक विषय यामध्ये समाविष्ट केले आहेत. आता यावर्षापासून म्हणजे 2015 जुलै पासून संस्कृत-हिंदी-मराठी सर्वच भाषांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये बदल केला आहे. एखादी भाषा वापरल्याने चलनात राहते हा दृष्टीकोन ठेऊन शिकविली तर ती भाषा मृत होणार नाही. शिवाय हिंदी-हिंदीतून, मराठी-मराठीतून, इंग्रजी-इंग्रजीतून मुले शिकतात,वापर करतात मग संस्कृतच का नाही? थोडक्यात संस्कृतच्या बाबतीत कान उघडे, डोळे उघडे पण तोंडाला कुलुप अशी अवस्था होती. संस्कृतमधील छोटी छोटी वाक्ये मुलांनी बनवावीत,बोलावीत, संभाषण करावे.कृती करावी यादृष्टीने कृतिपत्रिका communicative approach ठेऊन 9वी 10वी साठी बनविण्यात आली.
      मग या धर्तीवर सप्टेंबर मध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर संस्कृत अध्यापकांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले पण -----या प्रशिक्षणात इयत्ता आठवी संपूर्ण व संयुक्तसाठी पण कृतिपत्रिकाच तयार करा असे सांगितले. आता पाठ्यपुस्तकाची समीक्षा आणि वरील विषयाचा काय संबंध ?
            तर सर्वात महत्वाचा संबंध आहे तो असा की,
      मुल्यामापनाचे स्वरुप ----------- अभ्यासक्रम हे दोघेही परस्परांवर अवलंबून व पूरक असतात. त्यामुळे 2015 पासून जर मूल्यमापनाचे स्वरुप बदलले असेल तर पाठ्यपुस्तकाची रचना त्याप्रमाणे आहे का ? हे पाहणे अत्यंत महत्वाचे ठरते. पाठ्यपुस्तकाची समीक्षा ही फार मोठी संकल्पना आहे.समीक्षा या शब्दाचा अर्थ न्याहाळणे, तपास, पूर्ण विचार आत्मविद्या,मुख्य तत्व,सम+ ईक्ष् - 1 आ.प पाहणे विचार करणे असा होतो.मग या दृष्टीकोनातून आपण इयत्ता आठवीच्या संपूर्ण संस्कृत विषयाच्या पाठ्यपुस्तकाकडे न बघता शिकवताना येणारे चांगेल वाईट अनुभव, पूरक व आवश्यक गोष्टी येथे पाहुया.
      पाठ्यपुस्तकाचे मुखपृष्ठ व मलपृष्ठ - संस्कृत भाषेचा सुगंध सर्वत्र दरवळावा म्हणून फुललेल्या फुलांचा आकर्षक ताटवा या मुखपृष्ठावर शोभून दिसत आहे तर मलपृष्ठावर विद्यार्थीरुपी हंस ज्ञानगंगेत मुक्तपणे विहार करताना दिसत आहे. या पुस्तकाचे नांव संस्कृत संपूर्ण अभ्यासक्रमासाठी संस्कृत-प्रवेश,इयत्ता आठवी असे दिले आहे. मुखपृष्ठाच्या आतील बाजूस महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ असा लोगो आहे. त्यावर देखील संस्कृत ब्रीद वाक्य आहे-
      सा विद्या या विमुक्तये ।
      खरोखरच या ठिकाणीच संस्कृतचे महत्व मंडळाने ओळखल्याचे जाणविते. आतील पानावर प्रथमावृत्ती दि 2009 -संस्कृत समिती मधील मान्यवर, संयोजन प्रमुख, सहाय्यक,चित्रकार निर्मिती, टाईपसेटिंग,कागद इ.कायदेशीर बाबींची माहिती दिलेली आहे.
      भारताचे संविधानातील प्रास्ताविका मराठीत तर प्रतिज्ञा संस्कृत भाषेत देण्यात आली आहे. मा.श्री.विवेक गोसावी प्र.संचालक यांची प्रस्तावना आहे. हे पुस्तक 8वी चे असल्याने महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 2004 नुसार हे पुस्तक बनविले आहे.
     

      अनुक्रमणिका अतिशय सुटसुटीत आहे. इयत्ता आठवी हा एस.एस.सी. बोर्डाच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा पहिला वर्ग आहे. त्यामुळे अत्यंत सोप्या व सुटसुटीत पाठ्यक्रम निवडल्याचे जाणवते. एकूण 17 पाठ, 4 व्याकरण विवेचने,6 परिशिष्ठे -प्रश्नपत्रिका आराखडा व पाठांतरासाठी नियुक्त पाठ क्र.  या अनुक्रमणिकेत दिले आहेत.
      आतील लगेचच्याच पानावर चित्रांमधून एकवचन,द्विवचन,बहुवचन त्याचप्रमाणे प्रथम पुरुष,द्वितीय पुरुष व तृतीय पुरुष समजावून दिला आहे. त्याचप्रमाणे पुढील पानावर चित्रातूनच एतद् सर्वनाम समजावून दिले आहे.पुढील पानावर संक्षेपांचा खुलासा दिला आहे. उदा.पुं.- पुंलिंगी, वर्त.- वर्तमानकाळ, प्र.भू.- प्रथम भूतकाळ यामुळे संक्षेप लिहिणे बोर्डसाठी चालणार आहे हे सिद्ध होते.
      आठवीचे हे पुस्तक जुन्या बांधणीचे व रचनेतील आहे. त्यामुळे या पुस्तकाचा साईज 1/8 एवढाच आहे. खरंतर ही छोटी पुस्तकं छान वाटत होती. दप्तराचे ओझे त्याने कमी होत होते. या पाठ्यपुस्तकात गद्य व पद्य विभाग वेगवेगळे नाहीत. सर्व एकत्रच आहे पण शिकवताना त्यामुळे नाविन्य निर्माण होत आहे.
      सुभाषितमाला-1 ने पाठ्यपुस्तकाला सुरुवात झाली आहे. शुभकार्यारंभी आपण नेहमी देवाला वंदन करतो तसे विद्यारंभी एक कन्या सरस्वतीस वंदन करताना चित्रित केली आहे. अत्यंत संस्कारक्षम विषयांवरील श्लोक या सुभाषितमालेत आहेत. यामध्ये सर्वात मला आवडलेला श्लोक म्हणजे -
      प्राप्ते तु षोडशे वर्षे पुत्रे मित्रवदाचरेत् ।
      यथा पुत्रे तथा पुत्र्यां स्नुषायामपि नान्यथा ।।
      जसं मुलाला वागणूक देता तशी मुलीला व सूनेला द्या. खरोखरच सध्याचा 'बेटी बचाओ,बेटी पढाओ' हाच संदेश यातून दिला आहे.
      दुसरा धडा- प्राथमिक वाक्ये बनवता येण्यासाठी उपयुक्त आहे. निसर्ग सौंदर्याचा आस्वाद, भूतदया निर्माण होण्यासाठी मयूरः। हा छानसा माहितीपर पाठ दिला आहे. माणसाच्या अंगी योग्य ती निर्णयक्षमता असणे अत्यंत आवश्यक आहे.   अन्यथा अनर्थ ओढावेल. हा संदेश देणारी 'मूर्खसेवकः न रक्षणीयः।' ही राजा व वानर यांची कथा आहे. परस्पर प्रेम, सहकार्याची भावना, कृतज्ञता असेल तर आपण कोणत्याही संकटातून बाहेर पडू शकतो. वाईट शक्तींचा नाश करु शकतो. हे सांगणारी चटका पिपीलिकाश्र्च। ही कथा आहे. सुभाषितमाला-2 मध्ये ऐक्य, औदार्य, शूरता, सौजन्यशीलता, वक्तृत्वगुण निर्माण करणारी सुभाषिते आली आहेत. यातील सर्वात छान सुभाषित आहे -
      नाहं जानामि केयूरे नाहं जानामि कुण्डले ।
      नूपुरे त्वभिजानामि नित्यं पादाभिवन्दनात् ।।
      रामायणातील लक्ष्मणाच्या तोंडी असणारा हा श्लोक आपली भारतीय संस्कृती प्रतीत करतो. भावजयीकडे वर नजर करुन पाहण्याची सुद्धा आपली संस्कृति नव्हती.नेहमी पदकमलांना (सीतेच्या) वंदन करत असल्याने लक्ष्मण म्हणतोय "दादा मला फक्त सीतामातेचे पैंजणच ओळखता येतात" असे श्लोक मुलांपुढे आणले पाहिजेत. म्हणजे आता जी स्त्री-पुरुष अनैतिक वर्तणूकीची उदाहरणे माध्यमांद्वारे चघळली जाताहेत त्यापासून ही बालमने दूर जातील.
      आम्रवृक्षः। पाठातून आंब्याच्या झाडाची माहिती त्याचप्रमाणे त्याची परोपकारी वृत्ती दाखवली आहे. अत्यंत ऐरणीचा असा सध्याचा विषय म्हणजे स्वच्छता, नीटनेटकेपणा, श्रमप्रतिष्ठा, सौजन्यशीलता, समस्यानिराकरण, निर्णयक्षमता या मुल्यांचा मिलाफ म्हणजे स्वच्छता अभियानम्। हा संवादात्मक पाठ. याच विषयाशी साधर्म्य असणारा स्वच्छ, नीटनेटक्या पोषाखांचे महत्व सांगणारा -first impression is the last impression ही व्यक्तिमत्व विकासातील गुरुकिल्ली देणारा 'वासः प्रधानं खलु योग्यतायाः।' हा पाठ आहे.
      मनोरंजनातून प्रबोधन करणे ही काही सुभाषितांची खासीयत असते. अशी काही सुभाषिते प्रेहेलिका काव्यशास्त्रविनोदः या नवव्या पद्यात,तर 12 व्या सुभाषितमालेत देखील -ऐक्य, औदार्य वर्णन करणारी सुभाषिते आली आहेत. यात उल्लेखनीय दोन सुभाषिते आहेत.
      येषां बाहुबलं नास्ति .....................।
      चंद्रबलं देव कि कुर्यादम्बरस्थितम् ।। हे अंधश्रद्धा, ज्योतिषावर विश्वास ठेऊ नका तर तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे सांगणारे वरील सुभाषित तर
किं कोकिलस्य .......................।
किं जीवितेन पुरुषस्य निरक्षरेण ।।
साक्षरतेचे महत्व हे सुभाषित पटवून देते.
योग्य वेळी योग्य निर्णय घेणं खूप महत्वाचे असते. निर्णयक्षमतेचे महत्व सांगणारी पंचतंत्रातील वानरस्य चातुर्यम् । माकड आणि मगर ही कथा मुलांना खूप आवडते. या जगात कोणीही शाश्वत नाही सगळ्यांची अवस्था ही पुढीलप्रमाणेच असते.
      जो आला तो रमला पण शेवटी गेला म्हणून मी राजा, तो रंक असा सतत भेदभाव करुन समाजातील दरी वाढवू नये. हे सांगणारा अभेदः कुटीर-प्रासादयोः। हा पाठ आहे. मादाम कामांची राष्ट्रभक्ती, बलिदान व त्यांची सर्जनशीलता दाखवून देणारा क्रान्तिज्वाला मादाम-कामा। हा पाठ आला आहे. 'देश हा देव असे माझा' हे सांगणारे तुकडोजी महाराजांवरील माहितीपर पाठ आहे.
      संस्कृत विषयाचे शिखर, भारतीय परंपरेचा मानबिंदू म्हणजे रामायण यामधील शत्रुघ्नस्य प्रतिज्ञा । या पाठाने भावांभावामधील प्रेम, संवेदनशीलता, सुसंवाद दाखविला आहे. वक्तशीरपणा हे तर सर्व यशस्वी माणसांचे गमक असते. त्यामुळे या छोट्या वयात वेळेचे महत्व मुलांना समजले पाहिजे यासाठी समयनियोजनम्। हा पाठ आहे.
      वरीलप्रमाणे एकूण 17 धडे पाठ्यक्रमात आहेत. एकूण पाच पद्यपाठ तर 12 गद्यपाठ आहेत. यातील 1,6 व 12 पाठांतरासाठी नियुक्त आहेत. अत्यंत सुटसुटीत अशी चार व्याकरण विवेचने आहेत. संस्कृत वर्णमाला, लेखन नियम त्याचप्रमाणे अकारान्त, आकारान्त नामे त्यांच्या विभक्ती वचनानुरुप अर्थ, कारकार्थ दिले आहेत. राम शब्दाची सर्व रुपे एकाच श्लोकात असणारा वैशिष्ठ्यपूर्ण रामो राजमणि ........ हा रामरक्षेतील श्लोक दिला आहे. विशेषण -विशेष्य संबंध तर संस्कृत वाक्यरचनेचा गाभा आहे. इकारान्त ईकारान्त शब्द, प्रथम पुरुषी, द्वितीय पुरुषी,तृतीय पुरुषी सर्वनामे, वर्तमानकाळ व प्रथम भूतकाळ गणांचा पहिला गट 1,4,6,10 एवढाच आटोपशीर व्याकरणाचा समावेश पाठ्यक्रमात केला आहे. परिशिष्टात-अनुनासिके, लेखन पद्धत, संधिनियम, उपसर्ग त्यांचा वापर, उपसर्गाने ज्या धातूंच्या अर्थात, पदात बदल होतोय त्यांची उदाहरणे दिली आहेत. परिशिष्ट 4 व 5 विशिष्ट धातू व अव्यये त्यांना अपेक्षित विभक्ती यांचा सोदाहरण तक्ता दिला आहे. शेवटी लेखी व तोंडी परीक्षेचा 80+20 असा आराखडा दिला आहे.   
      वरीलप्रमाणे अत्यंत सुटसुटीत व छान, संस्कारक्षम पुस्तक इयत्ता आठवी साठीचे आहे. पण आता 1 ली ते 8 वी साठी आकरिक व संकलित मूल्यमापनाचा आराखडा आपल्याला वापरायचा आहे. याप्रमाणे इयत्ता 8 वी साठी 50+10 अशी प्रथम सत्र व द्वितीय सत्र लेखी परीक्षा घ्यायची आहे. मग अशावेळी गूण कमी झाले पण अभ्यासक्रम तेवढाच आहे त्याचे काय? मुलांवरचा गुणांचा बोजा कमी केला पण सगळ्या अभ्यासक्रमाला प्राधान्य मिळण्यासाठी परीक्षा सर्व अभ्यासक्रमावरच काढणार म्हणजे मुलांचा अभ्यासाचा ताण कुठे कमी झाला?  
      या पाठ्यपुस्तकाची सुरुवात सुभाषितमालेने केली आहे. पण आठवीच्या विद्यार्थ्यांना संस्कृत भाषा नविन आहे. ती संस्कृतच्या इयत्ता पहिलीत आहेत आणि लगेच एवढे शब्द मग त्यांची अशी का रुपे बनली, बरेच संधीयुक्त शब्द जसे शिष्यप्रियत्वमेताद्धि इ.नकोत. शिबिरस्य प्रारम्भः। सारखे सोपे धडे सुरुवातीला हवे होते. दुसऱ्या धड्यापासूनच लगेच क्रियापदांची रुपे दिली आहेत. मग व्याकरण विवेचन 2 आणि पाठ क्र.2 याची सांगड बसत नाही. आपण जरी त्यांना सांगितले की नुसते हे वाचा, मी नंतर शिकवणार आहे तर त्यांचा शिक्षकांवरील विश्वास कमी होतो आणि व्याकरण एक व दोन सलग घेतले तर विद्यार्थी संस्कृत किचकट आहे असे मानतात. पण शब्दार्थ वगैरे धड्याखाली आवश्यक ते सर्व दिले आहेत. यत्र, कुत्र, तत्र अशा अव्ययांचा वापर छान दिला आहे. पाठांखाली काही उल्लेखनीय अजून टीपांचा समावेश आवश्यक आहे. बाह्य भाषांतरासंबंधी काही नमुने पाठ्यपुस्तकात दिल्यास बरे होईल. ग्रामीण भागासाठी ते हितकारक ठरेल. उदा. शत्रुघ्नस्य प्रतिज्ञा-रामायण-कोणते काण्ड-कोणता-सर्ग इ.किंवा प्राप्ते तु षोडशे वर्षे चा मूळ श्लोक.
       इयत्ता आठवीच्या मानाने व पहिल्याच इयत्तेचे पुस्तक असल्याने यात चित्राचा वापर जास्त हवा होता. छोटी छोटी संस्कृत नीत्य उपयोगातील वाक्ये संवाद (C B S E च्या पाठ्यपुस्तकाप्रमाणे) घातली तर सुरुवातीलाच मुलांना वाटेल की,
      अमृतवाणी संस्कृतभाषा
            नैव क्लिष्टा न च कठिता।
      आता तर आपल्याला या पाठ्यपुस्तकात बऱ्याच गोष्टी कृतिपत्रिकेला अनुसरुन बदलाव्या लागतील. पण या पुस्तकातील कथा श्लोक आठवीच्या वयोगटाला पूरक आहेत. त्यांची पुनरावृत्ती नक्कीच चालेल. फक्त पाठाखालील स्वाध्यायाची रचना बदलावी लागेल. शिवाय संपादक मंडळ आणि पुस्तक प्रत्यक्षात अंमलात आणणारा घटक म्हणजे अध्यापक यांच्यातील संवाद वाढविण्यासाठी काही helpline म्हणून फोन नं. किंवा email ID दिल्यास शंका निरसन होतील. लकारांचा समावेश या पूस्तकापासूनच करावा.
      एकंदरीत पाठ्यपुस्तक वयोगटानुरुप व सर्व समावेशक आहे.



                                          माधुरी अभय कुलकर्णी 

No comments:

Post a Comment